अमेरिकेच्या एका इमिग्रेशन एजंटने ओरेगॉनमधील पोर्टलैंड येथे गुरूवारी एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांवर गोळीबार करत त्यांना जखमी केल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे, एक दिवस आधी मिनेसोटामध्ये ‘आयसीई’च्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर, शहर आणि राज्य अधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
“मिनियापोलिसमधील गोळीबाराच्या घटनेनंतर अनेकांच्या भावना तीव्र झाल्या असून ते प्रचंड तणावाखाली असल्याचे आम्हाला समजते, मात्र आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, समुदायाने शांतता राखावी अशी मी विनंती करत आहे,” असे पोर्टलैंडचे पोलीस प्रमुख बॉब डे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
पोर्टलॅंडमधील गोळीबाराची घटना जेव्हा गुरुवारी दुपारी घडली, तेव्हा अमेरिकेचे सीमा गस्ती एजंट एका विशिष्ट वाहनाला थांबवण्याची कारवाई करत होते, असे गृह सुरक्षा विभागाने एका निवेदनात सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, चालक, जो व्हेनेझुएलाच्या एका टोळीचा संशयित सदस्य होता, त्याने आपले वाहन ‘शस्त्र म्हणून वापरण्याचा’ प्रयत्न केला आणि एजंट्सना चिरडण्याचा प्रयत्न केला. यावर प्रतिक्रिया म्हणून, “एका एजंटने बचावात्मक गोळीबार केला,” आणि त्यानंतर चालक आणि एक प्रवासी गाडी घेऊन पळून गेले, असे डीएचएसने सांगितले.
रॉयटर्सला या घटनेच्या परिस्थितीची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही.
स्थलांतरितांवरील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी
पोर्टलँड आणि ओरेगॉनच्या नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, गोळीबारामागे नेमके काय कारण होते, किंवा ही हिंसा स्थलांतरितांवरील कारवाईशी संबंधित होती की नाही, याबद्दल त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही.
एफबीआय तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी, पोर्टलँडचे महापौर कीथ विल्सन आणि ओरेगॉनच्या गव्हर्नर टीना कोटेक, या दोन्ही डेमोक्रॅटिक नेत्यांनी, संपूर्ण आणि स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत फेडरल स्थलांतरितांवरील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली.
फेडरल अधिकाऱ्यांनी गोळीबाराचे वर्णन कसे केले याबद्दल बोलताना विल्सन म्हणाले, “एक काळ होता जेव्हा आम्ही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत होतो. तो काळ आता खूप मागे गेला आहे.”
त्याच पत्रकार परिषदेत, 28 वर्षांपूर्वी सोमालियातून निर्वासित म्हणून अमेरिकेत आलेल्या राज्य सिनेट सदस्य केसे जामा यांनी फेडरल स्थलांतरण अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले: “आम्हाला तुमची गरज नाही, तुमचे येथे स्वागत नाही, तुम्ही आमच्या समुदायातून चालते व्हा.”
पूर्वीच्या एका निवेदनात पोर्टलॅंड पोलिसांनी सांगितले होते की, शहराच्या पूर्वेकडील भागात एका वैद्यकीय दवाखान्याजवळ गोळीबार झाला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सहा मिनिटांनी आणि त्यात फेडरल एजंट्सचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्यावर, पोलिसांना माहिती मिळाली की, गोळी लागल्यामुळे जखमी झालेले दोन लोक – एक पुरुष आणि एक महिला – त्या वैद्यकीय दवाखान्याच्या ईशान्येस सुमारे 2 मैल (3 किमी) अंतरावर असलेल्या एका ठिकाणी मदत मागत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी त्या पुरुष आणि महिलेला टूर्निकेट लावले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती कशी आहे हे अद्याप कळू शकले नाही.
मिनियापोलिस गोळीबार
ही गोळीबाराची घटना, होमलँड सिक्युरिटी विभागातील बॉर्डर पेट्रोलपेक्षा वेगळी असलेली संस्था, यू.एस. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटच्या (ICE) एका फेडरल एजंटने मिनियापोलिसमध्ये एका 37 वर्षीय, तीन मुलांच्या आईला तिच्याच गाडीत गोळ्या घालून ठार मारल्याच्या दुसऱ्याच दिवशी घडली.
या घटनेमुळे मिनियापोलिसमध्ये दोन दिवस निदर्शने झाली आहेत.
रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांवरील कारवाईचा भाग म्हणून, ICE आणि बॉर्डर पेट्रोल या दोन्ही संस्थांचे अधिकारी अमेरिकेतील शहरांमध्ये तैनात करण्यात आले आहेत.
राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांनी या आक्रमक अंमलबजावणी मोहिमांचे कौतुक केले असले तरी, डेमोक्रॅट्स आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांनी या भूमिकेचा अनावश्यक चिथावणी म्हणून निषेध केला आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा आहे की गुन्हेगारी संशयित आणि ट्रम्प-विरोधी कार्यकर्ते वाढत्या प्रमाणात आपल्या गाड्यांचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत, दुसरीकडे, व्हिडिओ पुराव्यांमुळे काहीवेळा त्यांचे दावे खोटे ठरले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)



























