बुधवारी, रशिया आणि युक्रेनने एकमेकांवर हवाई हल्ले सुरू केल्याचा आरोप केला, ज्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धात मर्यादित युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्यानंतर, काही तासांतच हा सगळा प्रकार घडला.
पुतीन यांनी युक्रेनच्या ऊर्जा सुविधेवरील हल्ले थांबवण्यासाठी तात्पुरती सहमती दर्शवली, मात्र 30 दिवसांचा पूर्ण युद्धविराम स्विकारण्यास नकार दिला, जो कायमस्वरूपी शांतता कराराच्या दिशेने पहिले पाऊल, म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मागणीचा एक भाग होता.
झेलेन्स्की, ज्यांनी पूर्ण 30 दिवसांचा संघर्षविराम मान्य केला होता, त्यांनी पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील कॉलनंतर सांगितले की, ते मर्यादित संघर्षविरामाला पाठिंबा द्यायला तयार आहेत पण दुसरीकडे युद्ध लांबवण्यासाठी मॉस्कोच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखण्याचे आवाहन त्यांनी संपूर्ण जगाला केले.
दरम्यान, काही तासांनतर दोन्ही बाजूंनी हवाई हल्ल्यांचा अहवाल दिला.
युक्रेनकडून ड्रोन हल्ल्यांचा अहवाल
“रशिया सध्या नागरी पायाभूत सुविधा आणि लोकांना टार्गेट करुन हल्ला करत आहे -” असे झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ अँड्री येरमाक, यांनी रात्री टेलिग्रामद्वारे सांगितले.
ईशान्य युक्रेनमधील सुमी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रशियाच्या ड्रोन हल्ल्यांमुळे तेथील दोन रुग्णालयांचे नुकसान झाले आहे, यात सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु या हल्ल्यांनी रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर धाव घेण्यास भाग पाडले.”
‘युक्रेनच्या राजधानीला वेढलेल्या कीव प्रदेशात, रशियने केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका 60 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली आणि अनेक घरांचे नुकसान झाले,’ असे या प्रदेशाचे गव्हर्नर मायकोला कलाश्निक यांनी बुधवारी पहाटे सांगितले.
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील कॉलनंतर काही तासांतच, रशियाने युक्रेनविरुद्ध 40 हून अधिक ड्रोन हल्ले केल्याचे, झेलेन्स्की म्हणाले.
अनेक उड्डाणे स्थगित
दक्षिण रशियाच्या क्रॅस्नोडारच्या प्रदेशातील अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, ‘युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे कावकझस्काया गावाजवळ असलेल्या तेल साठवणीच्या केंद्रावर लहान स्वरुपातील आग लागली.’
“20 चौरस मीटर (215 चौ. फूट) परिसरात पसरलेल्या या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही, कारण 30 कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले,” असे दक्षिण रशियाच्या प्रदेश प्रशासनाने टेलिग्राम संदेशाद्वारे सांगितले.
दरम्यान, तेल ट्रांसशिपमेंट सुविधेवरील सर्व कामेही त्वरित थांबवण्यात आल्याचे, प्रशासनाने सांगितले.
रशियाच्या SHOT न्यूज टेलिग्रामने रात्रीच्या वेळी, एका औद्योगिक क्षेत्रात लागलेल्या आगीचा एक व्हिडिओ पोस्ट केला.
SHOT ने सांगितले की, ‘कावकझस्काया तेल ट्रान्सशिपमेंट पॉइंट ही निर्यात रेल्वे आणि कॅस्पियन पाइपलाइन कन्सोर्टियम (सीपीसी) पाइपलाइन सिस्टममध्ये रशियन तेल वाहतूक करण्यासाठी डिझाइन केलेली एक महत्त्वाची सुविधा आहे.’
रॉयटर्स SHOT च्या या रिपोर्टची स्वतंत्रपणे पुष्टी करू शकले नाही.
रशियाची उड्डाण निरीक्षक संस्था- रोसावियात्सियाने सांगितले की, ‘ते हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काझान, निझनी नोव्हगोरोड आणि निझनेकमस्क या सर्व विमानतळांवरील उड्डाणे स्थगित करत आहेत.’ हे सर्व तळ मॉस्कोच्या शंभर किलोमीटर पूर्वेला स्थित आहेत.
या संस्थेने उड्डाण स्थगितीचे नेमके कारण सांगितले नसले, तरी ड्रोन हल्ल्यांच्या अहवालानंतर सुरक्षेची खबरदारी म्हणून उड्डाणे स्थगित केली जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)