तेजस जेटसाठीच्या F404 इंजिन्सचे, ऑगस्टपासून नियमीत वितरण सुरु होणार

0
F404

अनेक महिन्यांच्या विलंबानंतर अमेरिकेची GE एरोस्पेस कंपनी, तेजस Mk-1A लढाऊ विमानांसाठी आवश्यक असलेल्या F404 इंजिन्सचे, ऑगस्टपासून नियमित वितरण सुरू करणार आहे. कंपनीकडून झालेल्या विलंबाचा भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमावर परिणाम झाला होता.

संरक्षण सचिव आर. के. सिंग यांच्या मते, GE एरोस्पेस कंपनी ऑगस्टपासून दरमहा नियमीत दोन इंजिन्सची डिलीव्हरी करेल आणि मार्च 2026 पर्यंत एकूण 17 इंजिन्सचे वितरण पूर्ण होईल.

जनरल इलेक्ट्रिकद्वारे (GE) निर्मित ‘F404 इंजिन्स’, ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने विकसित केलेल्या तेजस Mk-1A लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी अत्यावश्यक आहेत.

आत्तापर्यंत फक्त एकच इंजिन एप्रिल 2025 मध्ये वितरीत करण्यात आले असून, दुसरे इंजिन जुलैच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. मूळ 2023 च्या डिलिव्हरी वेळापत्रकाच्या तुलनेत हा खूप मोठा विलंब आहे.

HAL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. सुनील म्हणाले की,”LCA मार्क 1A च्या बाबतीत सांगायचे झाल्यास, आमच्याकडे सहा विमाने रांगे तयार आहेत, पण दुर्देवाने GE Aerospace कडून अद्याप इंजिन्स डिलिव्हर झालेली नाहीयेत.”

या विलंबाचा भारतीय हवाई दलावर थेट परिणाम झाला आहे. 2021 मध्ये, 83 तेजस Mk-1A विमानांसाठी ₹48,000 कोटींचा करार HAL आणि सरकार दरम्यान झाला होता, आणि त्यानुसार HAL ने पहिल्या विमानांच्या डिलिव्हरीची अपेक्षा केली होती.

HAL आता 2026 आर्थिक वर्षाच्या अखेरीस 12 विमाने वितरित करण्याचा विचार करत आहे, परंतु यासाठी इंजिन्स वेळेवर मिळणं गरजेचं आहे. दरमहा दोन इंजिन्स मिळाल्यास, HAL पुढील वर्षभरात 16 विमानं तयार करू शकते, असा अंदाज आहे.

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, यांनी यापूर्वी Mk-1A च्या उत्पादन वेळापत्रकातील घसरणीबाबत चिंता व्यक्त केली होती आणि पुरवठा अडचणी लवकर सोडवाव्यात, असे आवाहन केले होते.

HAL ने स्पष्ट केले की, हा विलंब त्यांच्या बाजूने नसून GE कडून वेळेत इंजिन्स न मिळाल्यामुळे झाला आहे. कोविडनंतरच्या उत्पादन अडचणी आणि अनेक वरिष्ठ अभियंत्यांनी कंपनी सोडल्यामुळे GE च्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.

HAL चे अध्यक्ष म्हणाले, “प्रत्येक कंपनीवर टीका होणे साहजिक आहे. पण आमच्या बाजूने कोणतीही अडथळा नाही. आम्ही विमाने तयार करत आहोत आणि ती डिलिव्हरीसाठी सज्ज करत आहोत. या आर्थिक वर्षात ती वितरित करता येतील.”

यासोबतच भारताने भविष्यातील तेजस Mk-2 साठी आवश्यक, GE F414 इंजिन्ससाठीच्या वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. या करारामुळे भारताच्या ‘एरोस्पेस उत्पादन क्षेत्राला’ चालना मिळणार असून देशाच्या रणनीतिक स्वायत्ततेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं जाईल.

तेजस Mk-1A हे बहु-भूमिकांसाठी डिझाइन केलेले लढाऊ विमान आहे, ज्यात आधुनिक अवियोनिक्स, AESA रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुईट्स आणि विविध प्रकारच्या अचूक मार्गदर्शित शस्त्रांची सुसंगतता आहे. हे भारताच्या हवाई सामर्थ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारं विमान मानलं जातं.

आता इंजिन्सच्या डिलिव्हरी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा असल्याने, भारतीय हवाई दलाला मार्च 2026 पर्यंत, किमान सहा तेजस Mk-1A विमाने प्राप्त होण्याची आशा आहे. यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी लढाऊ विमान कार्यक्रमाला आवश्यक गती प्राप्त होऊ शकते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleनेतान्याहू आणि ट्रम्प यांची भेट; इस्रायल-हमास शस्त्रीसंधीबाबत चर्चा
Next articleIndian Navy Signs Strategic Deal with BEL to Strengthen Maritime Domain Awareness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here