सीमेवरील लष्करी कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार, अफगाणिस्तानचा दावा

0

आफगाणिस्तानाने रविवारी असा दावा केला, की रात्रीच्या वेळेस सुरक्षा सीमेवर झालेल्या लष्करी कारवाईत त्यांनी, 58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राचे आणि हद्दीचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे, त्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले असल्याचे त्यांनी सांगितले.

या आठवड्यातच, आफगाणी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानवर काबूल आणि पूर्व आफगाणिस्तानमधील एका बाजारात बॉम्बस्फोट केल्याचे आरोप केले होते, ज्याला इस्लामाबादने दुजोरा दिला नाही किंवा ते नाकारलेही नाहीत.

तालिबान सरकारचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, “आफगाणी सैन्याने 25 पाकिस्तानी लष्करी पोस्ट ताब्यात घेतल्या, 58 सैनिकांना ठार केले आणि या चकमकीत 30 जण जखमी झाले.”

“आफगाणिस्तानाच्या सर्व अधिकृत सीमा आणि प्रत्यक्ष रेषा (de facto lines) पूर्णपणे नियंत्रणाखाली आहेत आणि बेकायदेशीर कारवाया मोठ्या प्रमाणात रोखल्या गेल्या आहेत,” असे मुजाहिद यांनी काबूलमधील पत्रकारांना सांगितले.

पाकिस्तानकडून जीवितहानीबाबत तात्काळ कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

पाकिस्तानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले आहेत, ज्यात ते दावा करतात की आम्ही अतिरेक्यांच्या अड्ड्या असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे, विशेषत: दुर्गम, डोंगराळ भागातील अतिरेकी तळांवर हल्ले केले आहेत. तथापि, शनिवारी रात्री झालेल्या तीव्र चकमकींमुळे दोन्ही शेजाऱ्यांमधील तणाव अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले की, “त्यांच्या सैन्याने सीमेवर प्रत्युत्तरात्मक आणि यशस्वी कारवाया सुरू केल्या आहेत.”

“जर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आफगाणिस्तानाची भौगोलिक अखंडता भंग झाली, तर अशावेळी आमच्या लष्करी दलांना राष्ट्राच्या सीमेचे रक्षण करण्याची पूर्ण मुभा आणि ते तीव्र प्रत्युत्तर देतीलच,” असा इशारा संरक्षण मंत्रालयाने दिला.

वाढत्या तणावामुळे, बॉर्डर क्रॉसिंग बंद

दोन्ही देशांमधील दोन प्रमुख व्यापार मार्गांपैकी एक असलेला, तोरखम बॉर्डर क्रॉसिंग पॉईंट रविवारी सकाळी ८ वाजता, नेहमीच्या वेळेनुसार उघडण्यात न आल्यामुळे बंद राहिला. तर, नैऋत्य पाकिस्तानमधील चमन क्रॉसिंग पॉईंट देखील बंद करण्यात आला, ज्यामुळे वाहतूक आणि व्यापार पूर्णत: विस्कळीत झाला. अफगाणिस्तानामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफगाण निर्वासितांना कडक सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत परत पाठवण्यात आले.

चमनमधील काही नागरिकांनी, अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतातील स्पिन बोल्दाकवर जेट विमानांचा आवाज ऐकू आल्याचे सांगितले, तसेच त्यानंतर स्फोट झाल्याचे आणि परिसरातून धुराचे लोट दिसल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आफगाणी परराष्ट्रमंत्र्यानी, अंतर्गत अस्थिरतेसाठी पाकिस्तानला दोषी ठरवले

नवी दिल्लीत बोलताना, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या गटातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या पाकिस्तानच्या सततच्या आरोपांना फेटाळून लावले.

“पाकिस्तानी लष्कराने आदिवासी भागात केलेल्या कारवायांमुळे अनेक लोकांना विस्थापित व्हावे लागले, ज्यांना नंतर अफगाणिस्तानच्या भूमीवर आश्रय देण्यात आला. हे सर्व पाकिस्तानी नागरिक आहेत, अफगाणिस्तानी दहशतवादी नाहीत, आता अफगाणिस्तानात TTPचे अस्तित्व नाही,” असे मुत्ताकी यांनी स्पष्ट केले.

त्यांनी चंगेज खान आणि ब्रिटीशांचा संदर्भ देत, दोन्ही देशांमधील 2,400 किलोमीटर लांबीची वादग्रस्त सीमारेषा- डुरंड लाईन “चंगेज किंवा आंग्रेझ यांच्याद्वारे नियंत्रित केली जाऊ शकत नाही,” असे म्हटले.

“जर पाकिस्तानला शांतता हवी असेल, तर त्याने आम्हाला दोष देण्याऐवजी स्वतःच्या हद्दीतील समस्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. काहींना खूश करण्यासाठी ते स्वतःच्या लोकांना धोक्यात का आणत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तालिबानच्या परतण्याने तणावात वाढ

पाकिस्तान–आफगाणिस्तान सीमा, जी सुमारे 2,611 किलोमीटर (1,622 मैल) लांब आहे आणि सामान्यतः डुरंज लाईन म्हणून ओळखली जाते, ती दीर्घकाळापासून वादग्रस्त राहिली आहे. अफगाणिस्तानने कधीही औपचारिकपणे या सीमारेषेला मान्यता दिलेली नाही.

2021 मध्ये, तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून हे संबंध अधिक ताणले गेले आहेत, इस्लामाबादने काबुलवर पाकिस्तानविरोधी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे, आणि हा आरोप अफगाणिस्तानचे अधिकारी अजूनही नाकारत आहेत.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleदोन राष्ट्र, एक उद्दिष्ट: ‘कोकण 2025’ सरावातून भारत-युके भागीदारीला चालना
Next article‘तेजस मार्क 1A’ लढाऊ विमान आपल्या पहिल्या उड्डाणासाठी सज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here