ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये उष्णतेचा तडाखा, विक्रमी तापमानाची नोंद

0

बुधवारी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये उष्ण तीव्र वारे वाहत होते, ज्यामुळे परिसरातील वणवे अधिक तीव्र झाले आणि वसंत ऋतूतील तापमान विक्रमी उच्चांकावर पोहोचले. ऑक्टोबर महिन्यात, सिडनीच्या काही भागांमध्ये भयंकर उष्णता अनुभवायला मिळाली. 

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने सांगितले की, “मंगळवारी देशाच्या आऊटबॅक प्रदेशात तयार झालेला उष्ण हवेचा एक शक्तिशाली पट्टा, आता आग्नेय दिशेला सरकत आहे आणि त्यामुळे सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे.”

100 किमी/प्रतितास (62 मैल/प्रतितास) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वणव्याचा धोका वाढला असून, हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स राज्यात अनेक ठिकाणी ‘संपूर्ण आग बंदी’ जारी करण्यास सरकारला भाग पाडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 36 ठिकाणी वणवा लागला आहे, त्यापैकी नऊ आगींवर अद्यापही नियंत्रण मिळालेले नाही. याशिवाय जवळपास 2,000 स्थावर मालमत्तांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वसंत ऋतूतील उष्णतेची लाट

सिडनीच्या मध्यवर्ती व्यवसायिक भागात, दुपारपर्यंत तापमान 37 सेल्सिअस (98.6 अंश फॅरेनहाइट) च्या वर पोहचलेहोते, तर पेनरिथ आणि बँक्सटाउन या पश्चिम उपनगरांमध्ये जवळजवळ 40 सेल्सिअसच्यावर तापमान पोहोचले होते, ज्यामुळे ऑक्टोबरमधील उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले.

हवामान विभागाचे अंदाजकर्ते अंगस हाईन्स म्हणाले की, “अजूनही वसंत ऋतू सुरू आहे, मात्र आम्हाला हे अविश्वसनीय उष्ण तापमान पाहायला मिळत आहे.” सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचला भेट देण्यासाठी आलेल्या इंग्लडच्या टोनी इव्हान्स नावाच्या निवृत्त इसमाने, या तापमानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, “खूप गरम वारे वाहत आहेत आणि हे उष्ण तापमान मला आश्चर्यचकित करणारे आहे. त्यामध्ये थंडावा नाही, उलट ते आग ओकत असल्यासारखे वाटत आहेत.” 

आगीचा हंगाम हा साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत चालतो, जो दक्षिण गोलार्धातील वसंत ऋतूच्या अखेरीपासून उन्हाळ्यापर्यंत असतो.

हवामान अधिकाऱ्यांनी, लन्यूझीलंडमधील टास्मान समुद्राच्या पलीकडे, देशाच्या मध्य आणि दक्षिण भागांत दुर्मिळ “लाल” पातळीवरील वारे वाहणार असल्याचे इशारे जारी केले आहेत, जे फक्त अत्यंत तीव्र हवामान घटनांसाठी राखीव आहेत.

दक्षिण बेटावरील काइकोराजवळ आणि उत्तर बेटावरील हॉके’स बे येथे, वाऱ्यांमुळे भडकलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले.

आणीबाणीची स्थिती जाहीर

या वणव्यांमुळे आतापर्यंत पाच घरांसह अनेक स्थावर मालमत्ता नष्ट झाल्या आहेत. स्वीडिश फर्निचर क्षेत्रातील मोठी कंपनी IKEA ची मूळ कंपनी- इंग्का (Ingka) ने याची पुष्टी केली की, फर्निचरसाठी ठेवण्यात आलेली काही पाईनची झाडे आगीत जळाली आहेत, परंतु याचा कंपनीच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही. गंभीर हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठी, स्थानिक सरकारने बुधवारी दुपारी, कॅंटरबरी प्रदेशात आणीबाणीची स्थिती घोषित केली.

हवामान अंदाजकर्ते मेटसर्व्हिस यांनी सांगितले की, “गुरुवारी दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर वाऱ्याचे झोत 150 किमी/प्रतितास पर्यंत आणि राजधानी वेलिंग्टनच्या आसपास किमी/प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच थांबण्यास, अनावश्यक प्रवास टाळण्यास तसेच संभाव्य वीजपुरवठा आणि दळणवळण खंडित झाल्यास त्यासाठी तयारी ठेवण्याचा इशारा दिला आहे.

याआधी मंगळवारी, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता, आणि वेलिंग्टन पार्कमध्ये झाडाची फांदी अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमुत्ताकी यांच्या भेटीनंतर भारताने, काबुलमधील दूतावास पुन्हा कार्यान्वित केला
Next articleसरकारी शटडाऊन संपेपर्यंत डेमोक्रॅट्सना भेटण्यास ट्रम्प यांचा नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here