
“भारताने अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीवरील शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली आहे,” अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केली. रिपब्लिकन व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ओव्हल कार्यालयात बोलताना ट्रम्प म्हणाले की, “भारत आपल्यावर प्रचंड शुल्क लावतो, इतके जास्त की तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाही. हे जवळजवळ निर्बंध लावल्यासारखेच आहे, ज्यामुळे आमचा भारतात खूप कमी व्यवसाय होतो.”
“मात्र आता भारताने कर कमी आकारण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली असून, ते त्यांचे शुल्क बऱ्याच प्रमाणात कमी करू इच्छित आहेत कारण अखेर कोणीतरी त्यांना या गोष्टीची जाणीव करुन दिली आहे,” असेही ट्रम्प पुढे म्हणाले.
ट्रम्प यांनी ही टिप्पणी त्यावेळी केली, जेव्हा भारताचे वाणिज्य मंत्री पियूष गोयल, युनायटेड स्टेट्समध्ये व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेत आले आहेत.
गोयल यांनी आधीच त्यांच्या अमेरिकन समकक्षांची भेट घेतली आहे आणि दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये बहु-क्षेत्रीय व्यापार करारावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सांगितले की, “भारत आपल्या स्वारस्याला प्राधान्य देईल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व देशांसाठी परस्पर शुल्क लावण्याच्या घोषणेमध्ये अमेरिकेशी व्यापार संबंधित मुद्द्यांवर चर्चा करेल.”
विशाखापट्टणम येथील एका कार्यक्रमात सीतारमन म्हणाल्या की, जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) चौकटीनुसार टॅरिफ हे एक “कायदेशीर साधन” आहे परंतु भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर त्यांचे हित जपतील.
“टॅरिफ हे एक कायदेशीर साधन आहे, एक देश कर आकारेल आणि WTO च्या चौकटीशी सुसंगत आहे,” असे सीतारामन यांनी सांगितले.
“आता, दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि शुल्क चर्चांच्या संदर्भात, दोन्ही देश आपापल्या स्वारस्यांचे रक्षण करतील. आम्ही भारताच्या स्वारस्याला प्राधान्य देऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू,” असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.
अध्यक्षांनी बुधवारी पुन्हा सांगितले की, परस्पर शुल्क 2 एप्रिलपासून लागू होतील.
विश्लेषकांनी इशारा दिला आहे की, “परस्पर शुल्कामुळे उभरत्या बाजारपेठांतील अर्थव्यवस्थांमध्ये, जसे की भारत आणि थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर शुल्कवृद्धी होऊ शकते, कारण या देशांमध्ये अमेरिकन उत्पादकांवर जास्त प्रभावी शुल्क दर असतात.”
तर दक्षिण कोरियासारखे देश, ज्यांनी वॉशिंग्टनसोबत व्यापार करार केला आहे, त्यांना या उपायामुळे कमी धोका आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक असले तरी, अमेरिकेचे अध्यक्ष नेहमीच भारताला व्यापाराच्या बाबतीत “खूप मोठा अत्याचार करणारा” म्हणून संबोधतात.
या महिन्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमधील एक संयुक्त पत्रकार परिषदेत, ट्रम्प यांनी भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेले शुल्क यावर आपली नाराजी व्यक्त केली होती.
(IBNS च्या इनपुट्ससह)