उत्तर कोरियातील अण्वस्त्र साठ्यात चिंताजनक वाढ; अहवालातून धोक्याचे संकेत

0
उत्तर कोरियातील

कोरिया इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अ‍ॅनालिसिस (KIDA) च्या एका नवीन मूल्यांकनात, असा इशारा देण्यात आला आहे की, उत्तर कोरियाचा अण्वस्त्र उपक्रम सामान्यतः समजला जातोय त्यापेक्षा खूप मोठा असू शकतो, ज्याचा विस्तारही खूप वेगाने होत आहे.

द कोरिया हेराल्डनुसार, KIDA च्या न्यूक्लियर सुरक्षा विभागाचे प्रमुख ली सांग-क्यू यांनी या आठवड्यात झालेल्या एका चर्चासत्रामध्ये सांगितले की, “प्योंगयांगजवळ बहुधा 127 ते 150 अण्वस्त्रे असू शकतात, जी संख्या बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी उद्धृत केलेल्या आकड्यांपेक्षा दुप्पट आहे, त्यांचा अंदाज सुमारे 50 अण्वस्त्रांचाचा आहे.” KIDA ने व्यक्त केलेला हा अंदाज, उत्तर कोरियातील अण्वस्त्र सामग्रीचे उत्पादन आणि अलीकडील सुविधा विस्ताराच्या तपशीलवार पुनरावलोकनावर आधारित असल्याचे, ली यांनी स्पष्ट केले.

ली यांच्या मते, सध्याचा वाढीचा कल जर कायम राहिला, तर उत्तर कोरियाचा अण्वस्त्र साठे 2023 पर्यंत 200, तर 2040 पर्यंत 400 चा आकडा ओलांडू शकतात. त्यांनी किम जोंग-उन यांच्या वॉरहेड उत्पादनात “लक्षणीय” वाढ करण्याच्या निर्देशाचा उल्लेख केला, ज्यामुळे सरकारने युरेनियम समृद्धीकरण आणि प्लुटोनियम उत्पादन या दोन्हीचे प्रमाण वाढवले ​​आहे.

या अंदाजांचे विश्लेषण करताना, ली म्हणाले की- प्योंगयांगकडे आधीच 115–131 युरेनियम-आधारित वॉरहेड्स आणि 15–19 प्लुटोनियम-आधारित शस्त्रे असू शकतात, यावरून हे स्पष्ट होते की “अनेक बाहेरील तज्ज्ञ अजूनही कोरियाच्या अण्वस्त्र साठ्याचा अंदाज कमी प्रमाणात लावत आहेत.”

KIDA चे विश्लेषक या जलद वाढीचे श्रेय, अंशतः नवीन समृद्धीकरण सुविधांच्या बांधकामाला देतात. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने अलीकडेच योंगब्यॉन संकुलात नव्याने निदर्शनासा आलेल्या एका इमारतीची नोंद केली आहे, जी युरेनियम समृद्धीकरणासाठी वापरली जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान, यू.एस. मॉनिटरिंग ग्रुप 38 नॉर्थने तपासलेल्या उपग्रह प्रतिमांमधून 2025 मध्ये योंगब्योन येथे सतत अपग्रेड्स दिसत आहेत, ज्यात सेंट्रीफ्यूज ऑपरेशन्सशी जोडलेल्या आधार संरचना आणि उपकरणांचा समावेश आहे.

ली यांनी, उत्तर कोरियाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी प्रकल्पावरही भाष्य केले, जो यावर्षी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात आला. ते म्हणाले की, “या जहाजाचे काम अपूर्ण आहे, ज्यात त्याचे रिअॅक्टर आणि सोनार सिस्टीमसह काही महत्त्वाच्या घटकांची अजूनही कमतरता आहेत. जोपर्यंत रशिया वेळेची मर्यादा कमी करत नाही, तोपर्यंत कार्यान्वित होणारे पाणबुडी रिअॅक्टर विकसित करण्यासाठी उत्तर कोरियाला एक दशक लागू शकते,” असा इशारा त्यांनी दिला. 2023 च्या शिखर परिषदेनंतर प्योंगयांग-मॉस्को यांच्यातील लष्करी सहकार्य वाढत असल्याचे, त्यांनी नमूद केले. यामुळे संभाव्य अण्वस्त्र तंत्रज्ञान हस्तांतरणाबद्दल चिंता वाढली आहे.

अमेरिकेला प्रतिबंध घालण्याच्या किंवा प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेबद्दल उत्तर कोरियाच्या आक्रमक वक्तव्याकडे दुर्लक्ष करून, KIDA तज्ज्ञांनी प्योंगयांगच्या क्षमतांचे मूल्यमापन करताना, सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. संशोधक जिऑन ग्योंग-जू म्हणाले की, “उत्तर कोरिया मर्यादित अणुसंघर्षासाठी तयारी दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याची प्रणाली पूर्णपणे विकसित झालेली नाही.”

“बाह्यतः, उत्तर कोरियाने अशा क्षमतेचे स्वरूप तयार केले आहे, परंतु खऱ्या परिणामकारकतेसाठी अजून अधिक विकास आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.

या अभ्यासातील निष्कर्षांमुळे, निर्बंधांना न जुमानता आणि शस्त्र विकासाला वेग देत असतानाही, उत्तर कोरियाची झपाट्याने बदलणारी अण्वस्त्र भूमिका पाहून सोल, वॉशिंग्टन आणि टोकियोमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

मूळ लेखिका- अनुकृती

+ posts
Previous articleUAE कडून पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी, कारण …
Next articleचीनचे तियानगोंग अंतराळ केंद्र: सत्य की केवळ एक दिखावा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here