Air India अपघात: चौकशीत कॅप्टनच्या कृतींवर लक्ष केंद्रित, WSJ चा अहवाल

0

गेल्या महिन्यात, अहमदाबादमध्ये झालेल्या Air India विमान अपघातातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग (CVR) नुसार, कॅप्टनने इंजिनचा इंधन पुरवठा बंद केला असावा, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ (WSJ) ने बुधवारी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

12 जून रोजी झालेल्या, एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला होता, याप्रकरणी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासाचा हवाला वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राने आपला अहवाल सादर केला आहे.

भारताच्या विमान अपघात तपास विभागाने (AAIB), शनिवारी जारी केलेल्या अपघाताच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये- एका पायलटने दुसऱ्याला ‘तुम्ही इंधन स्विच का बंद केले?’ असे विचारल्याचे ऐकू आले आहे आणि त्यावर दुसऱ्या पायलटने ‘मी हे केले नाही’ असे उत्तर दिले आहे.

कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर, यांच्यापैकी नक्की कोणी-कोणते वाक्य बोलले आहे, याविषयी तपासकर्त्यांनी अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही. सभरवाल आणि कुंदर यांच्याकडे अनुक्रमे 15,638 आणि 3,403 तासांचा एकूण विमान चालवण्याचा अनुभव होता.

वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात म्हटले आहे की: “कुंदर, जे विमान चालवत होते, त्यांनी कॅप्टन सभरवाल यांना विचारले की, रनवेवरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांतच त्यांनी इंधन स्विच ‘कटऑफ’ स्थानावर का हलवले?”

कोणतेही ठोस पुरावे नाहीत

केवळ शाब्दिक देवाणघेवाणीशिवाय, सभरवाल यांनी स्विच हलवले होते का, याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आला असल्याचे, WSJ ने सांगितले नाही. मात्र, त्यांनी काही अमेरिकी पायलट्सचा हवाला दिला – ज्यांनी भारतीय तपास अहवाल वाचले होते. त्या पायलट्सच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कुंदर विमान उडवत होते, तेव्हा त्या टप्प्यावर त्याच्या दोन्ही हातांमध्ये विमानाचे नियंत्रण पूर्ण नियंत्रण असणे अपक्षेत आहे.

AAIB, DGCA, नागरी उड्डाण मंत्रालय, एअर इंडिया आणि भारतीय पायलट्सचे संघटन – यापैकी कोणतीही संस्था WSJच्या अहवालावर त्वरित प्रतिक्रिया देऊ शकली नाही. बोईंगनेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

AAIB च्या प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे की, “उड्डाण होताच इंधन स्विच ‘रन’ वरून ‘कटऑफ’ वर एक सेकंदाच्या फरकाने बदलले गेले.” मात्र, हे स्विच नेमके कोणत्या प्रकारे हलवले गेले, हे नमूद केले नव्हते.

विमान उड्डाण करताच, सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाइन नावाचा बॅकअप एनर्जी स्रोत सक्रिय होताना दिसला, ज्याचा अर्थ इंजिनमधून ऊर्जा पुरवठा बंद झाला होता.

लंडनकडे निघालेलं हे विमान, उड्डाणानंतर थ्रस्ट गमावत गेलं आणि 650 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर  Wखाली झुकायला लागलं.

दोन्ही इंजिनसाठी इंधन स्विच पुन्हा ‘रन’ वर आणण्यात आले, आणि विमानाने स्वतःच इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, असे WSJ च्या अहवालात म्हटले आहे.

मात्र, ‘विमानाची उंची आणि वेग इतके कमी होते की, ते पुन्हा नियंत्रणात येऊ शकले नाही,’ असे एव्हिएशन सेफ्टी तज्ञ जॉन नान्स यांनी सांगितले.

अहवालानुसार, विमान झाडे आणि एका चिमणीला धडकून, जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका इमारतीवर कोसळले आणि आग लागली, ज्यामध्ये जमिनीवरील 19 जण आणि विमानातील 241 प्रवासी ठार झाले.

कोणतीही सुरक्षा शिफारस नाही

सोमवारी एका अंतर्गत मेमोमध्ये, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, “प्राथमिक अहवालात कोणतीही यांत्रिक किंवा देखभालाशी संबंधित चूक आढळून आलेली नाही आणि सर्व आवश्यक देखभाल वेळेवर केली गेली होती.”

AAIB च्या प्राथमिक अहवालात बोईंग किंवा GE (इंजिन निर्माता) यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा शिफारस करण्यात आलेली नाही.

हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि बोईंग यांनी खासगी सूचनांद्वारे सांगितले की, “बोईंग विमानांवरील इंधन स्विच लॉक सुरक्षित आहेत.”

नान्स यांनी सांगितले की, “सध्या मिळालेल्या सर्व परिस्थितिजन्य पुराव्यांनुसार, एका क्रू मेंबरने इंजिन इंधन स्विच बदलले असावेत, कारण सध्या उपलब्ध माहितीनुसार याशिवाय दुसरे कोणतेही तर्कसंगत स्पष्टीकरण नाही. तपासकांनी अजूनही इतर सर्व घटकांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे आणि हे सर्व स्पष्ट होण्यासाठी काही काळ लागणार आहे.”

विमानांचे अपघात विविध कारणांमुळे होतात आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, अपघातानंतर एका वर्षाच्या आत अंतिम अहवाल अपेक्षित असतो.

दरम्यान, एअर इंडिया अपघातानंतर कॉकपिट इमेज रेकॉर्डर्स (फ्लाइट डेक कॅमेरे) बसवावेत का, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

नान्स म्हणाले की, “जर त्या वेळी कॉकपिटचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध असते, तर तपासकांना खूप मदत झाली असती.”

अपघातानंतर एअर इंडिया कंपनीवर इतर अनुषंगाने देखील अधिक चौकशी सुरू झाली आहे.

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने, या महिन्यात सांगितले की: “ते एअर इंडियाची बजेट विमान कंपनी- एअर इंडिया एक्सप्रेसचीही चौकशी करणार आहेत. कारण त्या कंपनीने Airbus A320 विमानाच्या इंजिनच्या भागांमध्ये बदल करण्याच्या निर्देशाचे पालन न केल्याचे, तसेच खोटे रेकॉर्ड दाखवल्याचे वृत्त याआधी समोर आले आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात, युरोप करार देखील शक्य – ट्रम्प
Next articleAkash Prime Tested at 15,000 Feet, Boosting India’s High-Altitude Air Defence Capabilities

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here