तस्मानमध्ये अमेरिकन तटरक्षक दलाचा चिनी नौदलाशी संवाद साधण्यास नकार

0
अमेरिकन तटरक्षक
25 फेब्रुवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एचएमएएस कुट्टाबुल येथील बंदरात अमेरिकन तटरक्षक दलाचे राष्ट्रीय सुरक्षा कटर मिडगेट बघायला मिळाले. (रॉयटर्स/किर्स्टी नीधम)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडबरोबर सागरी सुरक्षा सहकार्यासाठी तस्मान समुद्रातून जाणाऱ्या अमेरिकन तटरक्षक दलाच्या कटरला जवळच्या चिनी नौदलाच्या जहाजांची माहिती मिळाली होती. मात्र त्यांच्याशी आपला कोणताही संवाद झाला नाही, असे त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. 

लाइव्ह-फायर ड्रिल्स

चीनच्या नौदलाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात शुक्रवारी आणि शनिवारी लाइव्ह-फायर ड्रिल्स आयोजित केली होती. ज्याचे ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी अभूतपूर्व असे वर्णन केले आहे. मात्र या सरावामुळे विमान कंपन्यांना सुरक्षेच्या कारणास्तव 49 व्यावसायिक विमानांचे उड्डाण मार्ग बदलणे भाग पडले.

 

पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही फ्रिगेट, क्रूझर आणि इंधन भरणारी जहाजे यांच्या हालचालींवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संरक्षण दलांकडून लक्ष ठेवले जात आहे.

अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे राष्ट्रीय सुरक्षा कटर मिडगेट हे तस्मान समुद्र ओलांडून शनिवारी न्यूझीलंडहून सिडनी बंदरात पोहोचले.

“आम्हाला त्यांच्या उपस्थितीची माहिती होती,” मिडगेटचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन मॅथ्यू रूनी यांनी मंगळवारी सिडनी येथे चिनी जहाजांबद्दल पत्रकारांना सांगितले.

“अर्थात त्याचा आमच्या कामांवर कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही समुद्रातील टक्कर रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय निकष तसेच नियमांचे पालन करतो आणि आमची कोणतीही चकमक झाली नाही. चिनी नौदलानेही असेच करावे अशी आमची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.

‘राजनैतिक संकल्पा’ची परीक्षा

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक युआन ग्रॅहम म्हणाले की, चिनी नौदलाने आयोजित केलेला हा सर्वात दूरचा दक्षिणेकडील सराव होता आणि आपली शक्ती दाखवण्यासाठी दक्षिण प्रशांत महासागरातील नौदलाचा तळ आवश्यक नसल्याचे दर्शविले.

चीन बहुधा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा सुरक्षा सहकारी असलेल्या अमेरिकेच्या राजनैतिक संकल्पाची परीक्षा घेत आहे, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, “हा एक स्पष्ट संकेत आहे की चीनला (अमेरिकेच्या) सर्वात जवळच्या पॅसिफिक सहकाऱ्याच्या इतक्या जवळ काम करण्यात कोणताही धाक वाटत नाही.”

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की पीपल्स लिबरेशन आर्मीचे नौदल दूरच्या पाण्यात सराव आणि प्रशिक्षण घेत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय कायदे आणि पद्धतींनुसार सुरक्षा नियमांचे पालन करत आहे.

पॅसिफिकमधल्या पेट्रोलिंगमध्ये वाढ

पॅसिफिक बेटांच्या देशांच्या निमंत्रणावरून चीनसह दूरवरच्या ताफ्यांद्वारे बेकायदेशीर मासेमारीसाठी गस्त घालत, अमेरिकन तटरक्षक दलाने 2024 पासून दक्षिण पॅसिफिकमध्ये पेट्रोलिंग वाढवले आहे.

चीनने 2025 मध्ये प्रथमच पॅसिफिक बेटांमध्ये मत्स्यपालनावर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालावी लागते या कारणास्तव तटरक्षक दलाच्या डझनभर जहाजांची नोंदणी केली, मात्र अद्याप त्यातील कोणतेही जहाज तैनात केलेले नाही.

दक्षिण चीन समुद्रातील आपल्या सागरी सीमेवरील दाव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चीन आपल्या तटरक्षक दलाचा वापर करतो.

रूनी म्हणाले की, अमेरिकन तटरक्षक दल प्रशांत महासागरात “द्विपक्षीय आमंत्रणांद्वारे राष्ट्रांना त्यांचे राष्ट्रीय सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यात मदत करण्यासाठी आहे-द्वेषपूर्ण वर्तणूक रोखण्यासाठी आणि सागरी संसाधनांची अवैध खरेदी रोखण्यासाठी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी द्विपक्षीय सागरी करार झाले आहेत.”

सिडनी येथील एचएमएएस कुट्टाबुल फ्लीट बेसचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन रेबेका लेव्हिट यांच्या मते, ऑस्ट्रेलियामध्ये “समुद्राचा एक खूप मोठा तुकडा आहे ज्याचे संरक्षण करणे आणि या प्रदेशात ती स्थिरता प्रदान करणे आवश्यक आहे आणि आम्ही अमेरिकेशिवाय हे करू शकत नाही”.

मिडगेट पुढे अवैध मासेमारीच्या संदर्भातील गस्तीवर पापुआ न्यू गिनीला जाईल.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here