सायरन वाजवत, शहरे बंद करत तैवानचा युद्धजन्य परिस्थितीचा सराव

0
चिनी क्षेपणास्त्र हल्ला झाला तर त्यापासून बचाव कसा करायचा याची तयारी करण्यासाठी आयोजित वार्षिक हवाई हल्ल्याच्या सरावात तैवानची राजधानी तैपेईमध्ये गुरुवारी सायरन वाजवण्यात आले, रस्ते रिकामे झाले आणि लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले.

रस्ता रिकामा करण्याच्या सरावासाठी दुपारी 1.30 वाजता (5.30 GMT) सायरन वाजवण्यात आले. या सरावामुळे उत्तर तैवानमधील शहरे आणि गावे 30 मिनिटांसाठी प्रभावीपणे बंद करण्यात आली होती.

संरक्षण मंत्रालयाने फोन मेसेजद्वारे लोकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी इशारा पाठवला.

“हवाई संरक्षण कवायती सुरू. क्षेपणास्त्र हल्ला. तात्काळ आश्रय घ्या,” असे त्या इशाऱ्यात चिनी आणि इंग्रजीमध्ये लिहिले होते, त्यासोबत एक मोठ्या आवाजात अलार्म वाजला.

तैवानच्या अधिकाऱ्यांनी या महिन्यात हवाई हल्ल्याच्या सूचना जारी केल्यावर लोकांनी काय करावे याबद्दल सूचना अपडेट केल्या, ज्यामध्ये वेळेवर आश्रयस्थानात जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी किंवा कार चालवणाऱ्यांसाठीच्या सूचनांचा देखील समावेश आहे.

लोकशाही पद्धतीने शासित तैवानला आपला प्रदेश मानणाऱ्या चीनने गेल्या पाच वर्षांत तिथे आपला लष्करी दबाव वाढवला आहे, ज्यामध्ये तैवानच्या हवाई हद्दीत जवळजवळ रोजच लढाऊ विमानांचे घिरट्या घालणे समाविष्ट आहे.

गेल्या 24 तासांत तैवानभोवती 58 चिनी लष्करी विमाने आढळून आली आहेत, असे त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यापैकी 45 विमाने तैवान सामुद्रधुनीच्या मध्यरेषेला ओलांडून पलिकडे गेली. हा भाग एक अनधिकृत बफर झोन आहे.

तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते, ज्यांची चीन “फुटीरतावादी” म्हणून निंर्भत्सना करतो, ते बीजिंगचे सार्वभौमत्वाचे दावे नाकारतात. त्यांच्या मते फक्त तैवानचे लोकच त्यांचे भविष्य ठरवू शकतात. त्यांनी वारंवार चीनला चर्चा करण्याची ऑफर दिली आहे परंतु त्यांना कायम नकारच मिळाला आहे.

चीनने तैवानला आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी बळाचा वापर करणे कधीही सोडलेले नाही.

या सरावादरम्यान, तैपेईमधील पोलिसांनी वाहनांना रस्त्यांच्या कडेला जाऊन उभे राहण्याचे निर्देश दिले आणि लोकांना आश्रय घेण्यास सांगितले. काही दुकाने आणि रेस्टॉरंट्सनी शटर खाली ओढून आतले दिवे बंद केले. रात्रीच्या वेळी हल्ला झाल्यास लक्ष्य बनण्याचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले.

30 मिनिटांनंतर सायरन वाजून सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात आले.

नागरी संरक्षण सराव तैवानच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लष्करी सरावांसोबत एकत्रच होत आले आहेत. या सरावात त्याच्या कमांड सिस्टम आणि पायाभूत सुविधांवर करण्यात आलेले खोटे हल्ले, तसेच चीनच्या ग्रे झोन रणनीतींमध्ये लष्करी घुसखोरी आणि तैवानच्या प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी डिझाइन केलेली चुकीची माहिती देणारी मोहीम यांचा देखील समावेश आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleNATO Turns Up Heat on BRICS Founders Over Russia Ties
Next articleभारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात, युरोप करार देखील शक्य – ट्रम्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here