रात्रभर झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा बंद

0
शनिवारी रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवर झालेल्या चकमकीत डझनभर सैनिक ठार झाल्याचे दोन्ही देशांनी रविवारी कबूल केले. काबूलमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून या शेजारी देशांमधील हा सर्वात तीव्र संघर्ष आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले की या चकमकीत त्यांचे 23 सैनिक ठार झाले. तालिबानने म्हटले की त्यांचे नऊ सदस्य ठार झाले.

पाकिस्तानमध्ये हल्ले वाढवणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी इस्लामाबादने तालिबानला केल्यानंतर तणाव वाढला आहे, कारण ते अफगाणिस्तानमधील आश्रयस्थानांमधून काम करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. 2021 मध्ये सत्तेत आलेल्या तालिबानने मात्र पाकिस्तानी अतिरेकी त्यांच्या भूमीत असल्याचे नाकारले आहे.

दोन्ही देशांनी कोणताही पुरावा न देता दुसऱ्या देशाची जास्त जीवितहानी झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांनी 200 हून अधिक अफगाण तालिबान आणि सहयोगी लढवय्यांना ठार मारले आहे, तर अफगाणिस्तानने म्हटले आहे की त्यांनी 58 पाकिस्तानी सैनिक मारले आहेत.

रॉयटर्स स्वतंत्रपणे या आकडेवारीची पडताळणी करू शकले नाही.

पाकिस्तानी हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर

पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी आणि तालिबानने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाकिस्तानने काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानातील एका बाजारपेठेवर हवाई हल्ले केले, ज्यामुळे तालिबानने प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. पाकिस्तानने अधिकृतपणे या हवाई हल्ल्यांना मान्यता दिलेली नाही.

शनिवारी उशिरा अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानी सीमेवरील चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तानने सांगितले की त्यांनी बंदुका आणि तोफांनी प्रत्युत्तर दिले.

दोन्ही देशांनी विरुद्ध बाजूच्या सीमेवरील चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्हिडिओ फुटेज शेअर केले, ज्यामध्ये अफगाण चौक्या उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की रविवारी सकाळी बहुतेक ठिकाणची ही चकमक थांबली. परंतु स्थानिक अधिकारी आणि रहिवाशांच्या मते, पाकिस्तानच्या कुर्रम भागात अधूनमधून गोळीबार सुरूच होता.

स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री आमचे ऑपरेशन संपले असल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते.

काबुलने रविवारी सांगितले की त्यांनी कतार आणि सौदी अरेबियाच्या विनंतीवरून हल्ले थांबवले आहेत. दोन्ही अरब आखाती राष्ट्रांनी या संघर्षांबद्दल चिंता व्यक्त करणारे निवेदन जारी केले होते.

“अफगाणिस्तानच्या कोणत्याही भागाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही,” असे तालिबान प्रशासनाचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी सांगितले. “इस्लामिक अमिरात आणि अफगाणिस्तानचे लोक त्यांच्या भूमीचे रक्षण करतील आणि या संरक्षणात दृढ आणि वचनबद्ध राहतील.”

मुजाहिद म्हणाले की काही भागात संघर्ष सुरू आहे.

दोन्ही देशांच्या सीमा बंद

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की पाकिस्तानने अफगाणिस्तानशी असलेल्या 2 हजार 600 किमी (1 हजार 600 मैल) सीमेवरील क्रॉसिंग बंद केले आहेत, ही वादग्रस्त वसाहतकालीन सीमा 1893 मध्ये ब्रिटीशांनी आखलेली डुरंड रेषा म्हणून ओळखली जाते.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की अफगाणिस्तानशी असलेल्या दोन मुख्य सीमा प्रवेश, तोरखम आणि चमन तसेच  खारलाची, अंगूर अड्डा आणि गुलाम खान येथील तीन लहान प्रवेशस्थाने रविवारी बंद करण्यात आले.

तालिबान नेते आणि परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी सध्या भारत भेटीवर आले असून झाले शुक्रवारी भारताने उभय देशांमधील संबंध सुधारण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हवाई हल्ले करण्यात आले. भारत हा पाकिस्तानचा दीर्घकाळापासूनचा शत्रू आहे. शिवाय या भेटीमुळे इस्लामाबादमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleगाझा परिषद: भारताचा भर सुरक्षित इस्रायल, व्यवहार्य पॅलेस्टिनी राज्यावर
Next articleट्रम्प इस्रायलमध्ये येताच हमासकडून इस्रायली ओलिसांच्या मुक्ततेला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here